एखाद्याचं नशीब कधी आणि कसं बदलेलं ते कोणालाच सांगता येणार नाही. अनेकदा आपण प्रयत्न करतो. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. दैवाचा खेळ काही निराळाच असतो. ओदिशाच्या कटक जिल्ह्यातील सेंधा बिलिलीसही गावातील स्वप्नेश्वर दास यांच्यासोबत असाच काहीसा प्रकार घडला. दास एकाएकी बेपत्ता झाले. कुटुंबानं कित्येक वर्षे त्यांची वाट पाहिली. मात्र दास यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे कुटुंबानं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आता तब्बल २६ वर्षांनी दास यांचा ठावठिकाणा कुटुंबाला समजला आणि त्यांची कुटुंबासोबत गाठभेठ झाली. ही अनोखी भेट पाहणाऱ्यांचे डोळे भरून आले.

स्वप्नेश्वर दास त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह ओदिशाच्या कटकमध्ये राहायचे. शेती करून उदरनिर्वाह चालवायचे. २६ वर्षांपूर्वी त्यांची मानसिक स्थिती ढासळली. ते अचानक बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी त्यांचा खूप शोध घेतला. मात्र काहीच हाती लागलं नाही. त्यामुळे स्थानिक परंपरेनुसार कुटुंबानं त्यांच्या नावानं अंत्यविधी केले. दास यांची पत्नी विधवेप्रमाणे आयुष्य जगू लागली.

दुसरीकडे मानसिक स्थितीवर परिणाम झालेले दास ओदिशाहून तमिळनाडूला गेले होते. विल्लुपुरम येथील अनभू ज्योती आश्रमातील काहींना ते रस्त्यावर फिरताना दिसले. आश्रमाच्या स्वयंसेवकांनी त्यांना दाखल करून घेतलं. १३ मार्च २०२१ रोजी दास यांना तमिळनाडूतून राजस्थानच्या भरतपूरमधील अपना घरयेथे आणण्यात आलं. योग्य उपचार मिळाल्यानं दास यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर दास यांनी अपना घरआश्रमाच्या व्यवस्थापकांना आपल्या घराचा पत्ता सांगितला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. वडील जिवंत असल्याची माहिती समजताच स्वप्नेश्वर दास यांचे पुत्र संजय कुमार दास तातडीनं भरतपूरला पोहोचले. तब्बल २६ वर्षांनी वडील आणि मुलाची भेट झाली. वडील बेपत्ता झाले, तेव्हा संजय १३ वर्षांचे होते. आता ते विवाहित आहेत.

मानसिक स्थितीवर परिणाम झाल्यानं वडील बेपत्ता झाले होते. त्यावेळी मी नववीत शिकत होता, असं संजय यांनी सांगितलं. आम्ही वडिलांना खूप शोधलं. त्यांची वाट पाहिली. अखेर काळजावर दगड ठेवून अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. मात्र अचानक ते जिवंत असल्याचं आम्हाला समजलं. आता मी त्यांना घरी नेण्यासाठी आलो आहे, अशा भावना संजय दास यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय