मी उजनी धरण _बोलतोय…. Ujani Dam information in marathi
होय मी उजनी धरणच बोलतोय ! आज जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या तोंडी माझे नाव ऐकलं म्हणून बोलावं म्हणलं मी पण जरा. मला सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखले जाते, पण अनेकदा जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या वादाचे केंद्रबिंदूही मीच राहिलो आहे.
भूमिपूजन ७ मार्च १९६६ :-
मला आजही तो दिवस आठवतो जेंव्हा सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या भीमेच्या (चंद्रभागा) पात्रावरील माझं भूमिपूजन सुरु होतं.
तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू होता.
नाईक यांनी नारळ वाढवला आणि यशवंतराव चव्हाण कुदळ मारण्यासाठी पुढे झाले अन त्यांच्या डोळ्यात पाणी आले.
धोतराचा सोगा डाव्या हाताने उचलून धरत त्यांनी कुदळ खाली टाकली. थोडेसे पुढे सरसावले. नदीपात्राच्या दिशेने दोन्ही हात जोडून ते उभे राहिले.
गदगदलेल्या आवाजात ते बोलले, “विठ्ठला मला माफ कर बाबा, मी औचित्यभंग करतोय. तुझी चंद्रभागा मी अडवलीय मला पदरात घे !” त्यांच्या कृपा दृष्टीमुळेच आज माझे अस्तित्व आहे.
खरंतर दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची महाराष्ट्राला कधीच वाणवा नाही; परंतु आजच्या साठमारीच्या राजकारणात ‘दूरदृष्टी’ या शब्दाला महत्व राहिले आहे का तुम्हीच सांगा.
१९८० साली माझे बांधकाम पूर्ण झाले.
मला स्वत:चे पाणलोट क्षेत्र नाही. मात्र, पुणे जिल्ह्यातील जवळपास १८ धरणांतून सोडलेले पाणी पुढे माझ्या पोटात जमा होते.
सोलापूर जिल्ह्यातली अनेक मुलं पुण्यात शिक्षणासाठी आहेत. त्यांना आई- बाबा पुण्यात पाऊस पडला का म्हणून विचारतात.
कारण याच पावसावर माझं आणि पर्यायाने तुम्हा सर्वांचं भवितव्य आहे.
सुरवातीला पूर्ण क्षमतेने भरणारा माझा जलाशय आणि त्यातून या भागात बळीराजाच्या पाटात खळकळून वाहणारे पाणी पाहून माझ्या निर्मितीचे सार्थक झाल्याचे समाधान लाभायचे.
कायम दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा सोलापूर जिल्हा पुढे सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागल्याचा आजही मला गर्व आहे.
मुळात माझी निर्मितीच शेतकऱ्यांच्या डोळ्याचं पाणी पुसण्यासाठी झाली. पण माझ्या निर्मितीसाठी कैक जणांचे संसार उद्धवस्त झाले होते ते ही तितकेच खरे म्हणा !
माझी राज्यात सर्वाधिक ११७ टीएमसी एवढी प्रचंड पाणी साठवण क्षमता.
गेल्या ४० वर्षांत माझ्या पोटातुन पाण्याचा पुरेपूर वापर तुम्ही सर्वांनी केला. पण गेल्या चाळीस वर्षात त्या पाण्यासोबत आलेला किती गाळ माझ्या पोटात साचला असेल?
जलतज्ज्ञांच्या मते माझ्या पोटात ४२ टीएमसीचा गाळ जमा झाला आहे. माझ्या नाका तोंडात गाळ जाऊन मी गुदमरतोय. माझा श्वास कोंडतोयच पण तुम्हा सर्वांचा श्वास ज्यावर चालू आहे.
त्या पाण्याची साठवण क्षमता सुमारे ४२ ते ४३ टीएमसी एवढी कमी झाली आहे हे खूप चिंताजनक आहे. पावसाळ्यात माझा पाणीसाठा शंभर टक्क्यांवर भरूनही उन्हाळ्यात पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ तुम्हा सर्वांवर येते.
तसेच माझी ११७ टीएमसी पाणी क्षमता असली तरी, माझ्या पोटात आतापर्यंत ४० ते ४२ टीएमसी एवढा गाळ जमा झालेला आहे, असे गृहीत धरून तेवढ्या क्षमतेचे पाणीही त्यात मोजले जाते.
पुणे शहराला दोन वर्षे पाणी पुरेल इतकी जागा गाळाने माझ्या पोटात व्यापली आहे.
६० टक्के वाळू व ४० टक्के माती अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या साह्य़ाने धरणात पाणी असतानादेखील काढता येऊ शकते असे तज्ञाचे म्हणणे आहे.
त्याचा विचार करता माझ्या पोटातील वाळूमिश्रित गाळ एकाचवेळी काढता येणे शक्य नाही तर दरवर्षी टप्प्या-टप्प्याने चार-पाच वर्षांत हा वाळूमिश्रित गाळ काढता येईल. यात दरवर्षी हजारो कोटींचा महसूल शासनाज्या तिजोरीत जमा होईल.
हे पण वाचा – एका माणसाने १.२ लाखात फक्त १२ आंबे विकत घेतले, त्याचे कारण जाणून घ्या !
माझ्या पाणीवाटपाचे नियोजन तर सातत्याने वादग्रस्त ठरत आहे.
याला कारणीभूत ठरत आहे, प्रत्येक वर्षी निर्माण होणारी अवर्षणग्रस्त स्थिती आणि पाण्याची वाढती मागणी.
मात्र या सर्व घडामोडींमध्ये माझे संवर्धन करण्यासाठी काहीच उपाययोजना होताना दिसत नाही.
माझ्याकडून पाण्याची मागणी प्रत्येक वर्षी वाढत आहे. त्यामुळे माझ्याकडील पाण्याचा एकेक थेंब आज महत्त्वाचा ठरत आहे.
अशा स्थितीमध्ये गाळ काढल्यानंतर वाढणाऱ्या पाण्याचे महत्त्व लक्षात येणार आहे. माझा उपयुक्त साठा ५३.५७ टीएमसी असताना पाणी वाटपाचे नियोजन मात्र ८३.९४ टीएमसीचे होते.
म्हणूनच आज तुम्हा सर्वांशी बोलावे वाटले. मला सोलापूर काय, इंदापूर काय किंवा मराठवाडा काय सर्वजण सारखेच.
पण मला माफ करा, इथून पुढे मी तुम्हा सर्वांची तहान भागवू शकेन असे मला वाटत नाही.
हे पण वाचा – घेवडा उत्पादकाने २० गुंठेत ६ लाख मिळवले, वाल लागवड माहिती !
एकतर गाळाने माझा श्वास कोंडत चालला आहे, आणि दुसरे म्हणजे सर्वांची तहान भागवण्यासाठी माझ्या पोटात अजून जास्तीचे पाणी येणे गरजेचे आहे.
कृष्णा-कोयनेचे वाहून जाणारे पाणी जर तुम्ही मला दिले तर इथून पुढे कोणालाच रस्त्यावर उतरू देण्याची वेळ मी येऊ देणार नाही.
लेकरांनो आज माझ्या नावाने तुम्ही पाणी वाचवण्यासाठी संघर्ष समिती काढली ! तसं मला वाचवण्यासाठी एखादी समिती काढता आली तर बघा एवढंच माझं म्हणणं तुम्हाला आज सांगायचं होतं !
या अनुषंगाने बोलू वाटते की नावापुरते शेतकरी आणि शेतीविषयक प्रश्नांचे राजकारण करून सत्तेत येणे हा अलीकडील काळात राजधर्म होऊ पाहतोय.
अशा प्रसंगी बहुपेडी व्यक्तिमत्वाच्या आणि लोककल्याणाची खरी तळमळ असणाऱ्या, माझ्या जलाशयात पाणी आणण्याची, पोटातील गाळ काढण्याची दूरदृष्टी ठेवणाऱ्यांनी एकत्र या आणि मला वाचवा !
तुमचाच यशवंतसागर जलाशय ! उजनी धरण !!
हे पण वाचा – एका माणसाने १.२ लाखात फक्त १२ आंबे विकत घेतले, त्याचे कारण जाणून घ्या !
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
या साईट ला सब्सस्क्राईब करा !
फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा
OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!