मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी “आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही,” असं मोठं विधान केलं. ते सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी (१ डिसेंबर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही. पोर्तुगीज, मोघल, ब्रिटिशांकडून या गोष्टी आल्या. महाराजांच्या काळातील एक ग्रंथ म्हणजे शिवभारत. त्यात ज्या गोष्टी सापडतात त्या आपल्यासमोर आहेत. या व्यतिरिक्त आपल्याकडे काही दाखले, पत्रच नाहीत. त्यामुळे यातून काहीतरी शोधून लोकांपर्यंत इतिहास पोहचावा लागतो. त्यामुळे प्रतापराव गुजरांबरोबर कोण सहा लोक होते याला काही अर्थच उरलेला नाही.”

“शिवरायांना धक्का लावणारा मायेचा पूत अजून…”

सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याशिवाय तुम्ही इतिहास दाखवूच शकत नाही. फक्त इतिहासाला धक्का लागणार नाही हे बघणं गरजेचं आहे. अशाप्रकारे शिवरायांना धक्का लावणारा मायेचा पूत अजून जन्माला यायचा आहे,” असं आक्रमक मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

“जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं”

राज ठाकरे इतिहासावर बोलताना म्हणाले, “जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं आहे. सध्या जातीतून इतिहास पाहण्याचं पेव फुटलं आहे. ठराविक मुठभर लोकच असं करत आहेत. त्यात त्यांचा राजकीय स्वार्थ आहे.”

“इतिहासाबद्दल कुतुहल वाटतं तेव्हा मी तज्ज्ञ मंडळींशी बोलतो”

“‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या कार्यक्रमात मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होतो. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सहा जणांची नावं टाकली. मग कोणीतरी बोललं ही सहा नावं नाहीत, तर ही सहा नावं आहेत. गंमत बघा, मला जेव्हा इतिहासाबद्दल कुतुहल वाटतं तेव्हा मी तज्ज्ञ मंडळींशी बोलतो. आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

“मी यावर काल पवार साहेबांशीही बोललो”

राज ठाकरे पुढे म्हणाले, “मध्यंतरी मी गजानन मेहंदळे यांना भेटलो. मी त्यांना विचारले की, वेडात मराठे वीर दौडले सातबाबत कोणी ही सहा नावं सांगत आहे, तर कोणी ती नावं सांगत आहेत. तुमचं म्हणणं काय? मी यावर काल पवार साहेबांशीही बोललो. ते मला म्हणाले की, गजाननराव बरोबर बोलत आहेत.”

“आतापर्यंत आपण जी नावं ऐकली ती सर्व काल्पनिक नावं आहेत”

“गजाननराव इतिहासाचे दाखले आणि संदर्भ यांचे ते अभ्यासक आहेत. मी मेहंदळे सरांना हे काय आहे असं विचारलं. ते शांत बसले आणि म्हणाले की, जगातल्या कोणत्याही इतिहासाच्या पानावर ते सात होते की आठ होते की दहा होते हे कोठेही लिहिलेलं नाही. प्रतापराव गुजर यांच्याबरोबर कोणत्या नावाचे कोण लोक होते याचा जगाच्या इतिहासात काहीही दाखला नाही. आतापर्यंत आपण जी नावं ऐकली ती सर्व काल्पनिक नावं आहेत,” असं राज ठाकरेंनी म्हटलं.

gautmi patil latest news : गौतमी पाटीलच्या लावणीला आवर घाला, नाहीतर… मनसेचा गंभीर इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय