आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन आहे. आपण लहानपणापासून शाळेत, कॉलेजमध्ये झेंडावंदन करत आलो आहोत. इंग्रजांच्या जोखडातून भारत मुक्त झाला तो दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. या दिवशी आपण आपल्या देशाची आन बान शान असलेला तिरंगा फडकवितो.
हा तिरंगा आपल्या देशाला कोणी दिला? त्यांचे नाव काय हे मात्र आपण नेहमी विसरतो. चला जाणून घेऊया या जन्मदात्याबद्दल…
इंग्रजांच्या काळात देशवासियांना तिरंग्याची भेट देणारे आंध्र प्रदेशच्या एका गावातील पिंगली व्यंकय्या हे होते. ते शाळेत शिक्षक होते. त्यांनी आपले उभे आयुष्य गरीबीत काढले, डोक्यावर कर्ज असताना त्यांचे निधन झाले. ते थोर क्रांतीकारक होते. देशाला तिरंगा देणाऱ्या या महानायकाची कहानी डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय राहणार नाही.
पिंगली व्यंकय्या हे ब्रिटिश सैन्यात होते. दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिश भारतीय सैन्यात काम केले होते. तिथेच त्यांना महात्मा गांधी भेटले. नंतर ते महात्मा गांधींपासून प्रभावित होत, क्रांतिकारक बनले. 1921 मध्ये त्यांनी आपल्या राष्ट्रीय ध्वजाची प्रारंभिक रचना केली. या ध्वजामध्ये नंतर काही बदल करून तो भारताचा राष्ट्रीय ध्वज बनला.
व्यंकय्या यांचा जन्म 2 ऑगस्ट 1878 रोजी कृष्णा (तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सी) येथील भातलापेनुमरू गावात पिंगली हनुमंत रायडू आणि वेंकट रत्नम यांच्या पोटी झाला. पिंगली व्यंकय्या यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या घरातून किंवा त्यांच्याकडे एक रुपयाही सापडला नव्हता. देशासाठी तिरंगा बनविला परंतू त्यांनी त्याचे श्रेय कधीच घेतले नाही. लाखो क्रांतीकारकांप्रमाणेच ते सामान्यच होऊन राहिले. ते एक उत्कृष्ट शिक्षक, कृषीतज्ज्ञ, लेखक आणि भाषाशास्त्रज्ञ होते. स्वत:च्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करत राहीले.
उदरनिर्वाहासाठी त्यांनी भाजीपाला पिकवला, तो विकला. परंतू त्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले. देशाला तिरंगा देणाऱ्या महानायकाच्या मदतीलाही कोणी आले नाही. माजी एमएलसी जीएस राजू, तत्कालीन खासदार केएल राव आणि इतर काहींनी त्यांच्या शेवटच्या दिवसांत आर्थिक मदत केली खरी परंतू त्यांच्यावरील कर्जही वाढत चालले होते. व्यंकय्या यांचा धाकटा मुलगा चलपती राव यांचा उपचाराविना मृत्यू झाला. चित्तनगरमध्ये त्यांचे झोपडीवजा घर होते, ते देखील लष्करातील त्यांच्या सेवेच्या बदल्यात मिळालेल्या जमिनीवर उभे होते.
व्यंकय्या यांनी ध्वजाची रचना करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आणि 1916 मध्ये ‘भारत देशनिकी ओका जातिया पतकम’ (भारताचा राष्ट्रीय ध्वज) हे पुस्तक प्रकाशित केले. त्यांनी ध्वजाच्या 30 मसुदा डिझाइन्स प्रकाशित केल्या, त्यांचे महत्त्व आणि भारतीय संस्कृती आणि वारसा यांच्याशी संबंध स्पष्ट केला.
4 जुलै 1963 रोजी त्यांचे निधन झाले आणि त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटले जावे ही शेवटची इच्छा होती. अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत ध्वज झाडाला बांधून ठेवण्यात आला होता.