इंदापूर प्रतिंनिधी:  हर्षवर्धन पाटील… असा नेता ज्याने सहा मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं. दोन दशकं मंत्रीपद भोगलं.. अगोदर गोपीनाथ मुंडे मग विलासराव देशमुखांच्या साथीने आपलं राजकारण सेट केलं.. पण राज्याच्या राजकारणात स्थान बळकट करत असतानाच २०१४ ला हर्षवर्धन पाटलांचं पानीपत झालं. पहिल्यांदाच विधानसभेच्या मैदानात उतरलेल्या दत्ता मामा भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचं वर्चस्व मोडतीत काढलं. पुढे हर्षवर्धन पाटलांना भाजपत जाऊनही आमदारकी मिळवता आली नाही. शिवाय पुनर्वसनंही झालं नाही.. कधीकाळी काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारं हे नाव आता राजकारणात मागे पडलंय. त्यातच अजितदादांच्या बंडाने इंदापुरातली समीकरणं बदलल्याने हर्षवर्धन पाटलांच्या संकटात भर पडलीय, अजितदादांच्या बंडामुळे हर्षवर्धन पाटलांची कशी कोंडी झालीय, वाचा….

हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेसमध्ये स्थान बळकट केल्यानंतर शरद पवारांविरोधात वर्चस्वाचं राजकारण केलं. पण अजितदादांच्या शिलेदाराने आव्हान दिल्यानंतर हर्षवर्धन पाटलांच्या राजकारणाला वेगळं वळण लागलं.

हर्षवर्धन पाटील यांची कारकीर्द

  • १९९५ ला काँग्रेसविरोधात बंडखोरी करून अपक्ष आमदार
  • युती सरकारला पाठिंबा देत मंत्रिपद मिळवलं
  • १९९९ ला अपक्ष लढून विजयी, काँग्रेसला पाठिंबा देत मंत्रिपदाची संधी
  • पुढची वाटचाल काँग्रेससोबत, आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी
  • मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या सहा मुख्यमंत्र्यांसोबत १९ वर्ष मंत्री पदाची संधी

२०१४ ला काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्याने इंदापुरात राष्ट्रवादीने हर्षवर्धन पाटलांविरोधात राजकारण केलं.

  • २०१४ ला १४ हजार मतांनी दत्ता भरणेंकडून हर्षवर्धन पाटलांचा पराभव
  • २०१९ ला जागा वाटपात इंदापूरची जागा कुणाला यावरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये संघर्ष,
  • स्टँडिंग आमदार राष्ट्रवादीचा असल्याने काँग्रेसला जागा सोडण्यास दादांचा विरोध
  • त्यामुळे भाजपत प्रवेश करत हर्षवर्धन पाटलांनी निवडणुक लढवली, पण दत्ता भरणे वरचढ
  • मविआ सरकारमध्ये मंत्री होताच भरणेंकडून वर्चस्व प्रस्थापित
  • राष्ट्रवादीतील फुटीत भरणेंची अजितदादांना साथ
  • भरणेंनी अजितदादांना साथ दिल्याने हर्षवर्धन पाटलांची कोंडी

हर्षवर्धन पाटलांचा सहकारात असलेली जबर ताकद पाहूनच अजितदादांनी दत्ता भरणेंना सहकारात बळ दिलं. पुणे जिल्हा परिषद, पुणे जिल्हा बॅंकेत पदांवर असताना भरणेंनी इंदापूरात आपले पाय रोवले. छत्रपती कारखान्याच्या माध्यमातूनही भरणेंनी मतदारसंघावर पकड मजबूत केलीय. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा पराभव करणं राष्ट्रवादीला शक्य झालं. त्यातच दत्ता भरणेंनी अजितदादांना साथ दिल्याने हर्षवर्धन पाटलांसमोर संभ्रम वाढलाय. भाजपमध्ये गेल्यावर चांगली झोप लागत असल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले होते. मात्र अजित दादा भाजपसोबत आल्याने हर्षवर्धन पाटलांची झोप उडू शकते, अशा चर्चांना उधाण आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय