लोणावळा : प्रतिनिधी सागर शिंदे: आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक विचार करणे गरजेचे – ऋजुता बनकर

लोणावळा येथे ३०० युवकांची जिल्हास्तरीय युवक परिषद संपन्न : आरोग्य, शैक्षणिक व उद्योगाबाबत तरुणांना मार्गदर्शन..

युवकांनी आपल्या आयुष्यात एक उच्च ध्येय ठेवावे. ते ध्येय साध्य करण्यासाठी, योग्य नियोजन करून, अहोरात्र कष्ट करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. युवक युवतींनी नकारात्मक विचारांना दूर ठेवून, आयुष्यात ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन भारतीय कॉर्पोरेट विधी सेवा, सनदी अधिकारी ऋजुता बनकर यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे ट्रेझर आयलँड रिसॉर्टच्या सभागृहात, रोट्रॅक्ट ३१३१ च्या वतीने, जिल्ह्यातील ३०० युवक युवतींनी दोन दिवसीय कार्यशाळेत जिल्हा प्रतिनिधी अ‍ॅड. आकाश चिकटे व राजशिष्टाचार आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. करिश्मा आवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाले होते. यावेळी सिनेअभिनेत्री अमृता देशमुख, माजी जिल्हा प्रतिनिधी अर्जुन देव, रोटरी डायरेक्टर डॉ. महेश कोटबागी, माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख, मंजू फडके, रोट्रॅक्ट मंडळ मार्गदर्शक संकेत जैन, विनोदी कलाकार मनराज सिंग उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी सनदी अधिकारी ऋजुता बनकर मार्गदर्शन करताना बोलत होते.

तसेच यावेळी सिनेअभिनेत्री अमृता देशमुख म्हणाल्या की, युवक युवतींनी चौकटी बाहेर जावून विचार करणे गरजेचे आहे. तसेच कम्फर्ट झोनच्या बाहेर जावून, जगाचा विचार करणे गरजेचे आहे. त्याशिवाय तरुणांना जगाचा अनुभव घेता येणार नाही. आरामाची जिंदगी पेक्षा, येणारा प्रत्येक दिवस सक्रियपणे व सकारात्मक जगल्यास नक्कीच यश मिळणार आहे. तसेच मुलींनी या स्पर्धेच्या युगात मागे न राहता, सक्षमपणे येणाऱ्या संकटाचा सामना करणे आवश्यक आहे.

रोट्रॅक्ट डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या युवक परिषदेत, मार्गदर्शन करताना सनदी अधिकारी ऋजुता बनकर, अमृता देशमुख, अ‍ॅड. आकाश चिकटे, करिश्मा आवारी व मान्यवर

युवक परिषद पूर्ण करण्यासाठी रोट्रॅक्ट क्लब ऑफ आकुर्डी फिनिक्सचे अध्यक्ष पुष्पराज पटेल, रोट्रॅक्ट क्लब ऑफ पुणे कॅम्प पायोनिअर्सचे अध्यक्षा तस्लिम इनामदार, रोट्रॅक्ट क्लब ऑफ बिबवेवाडीचे अध्यक्ष इशान सरनोत, रोट्रॅक्ट क्लब ऑफ शनिवारवाडाच्या अध्यक्षा एश्वर्या पाटील व कार्यक्रम समन्वयक अमेय म्हस्के, संस्कृती मोरे यांनी प्रयत्न केले. तर या चार क्लबच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामीण भागातील इंदापूर, बारामती, दौंड व आदी भागातील युवक सहभागी झाले होते.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निधी देणार

पर्यावरणातील वाढते प्रदूषण लक्षात घेता. रोट्रॅक्ट क्लबच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जागतिक स्तरावरील रोटरी इंटरनॅशनल कडून भरघोस निधीची उपलब्धता करून दिले जाईल. अशी ग्वाही जागतिक स्तरावरील रोटरी डायरेक्ट तथा माजी प्रांतपाल डॉ. महेश कोटबागी यांनी पॅनल चर्चे दरम्यान दिली. यावेळी माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख व अर्जुन देव, अ‍ॅड. आकाश चिकटे, सिद्धेश गायकवाड, दृष्टी सिंग, डॉ. करिश्मा आवारी यांनी पॅनल चर्चेत सहभाग घेतला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय