मुबलक पाणी, जमिनीची सुपीकता यामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेती बहरली आहे. मुख्य म्हणजे उजनी धरण व या धरणाच्या बॅक वॉटरचे पाणी आणि पक्षी पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. यामुळे या क्षेत्रात अनेक कृषि पर्यटन केंद्र विकसित होत आहेत. कुगावचे कोकरे आयलॅन्ड हे त्यापैकीच एक. इतिहासाचा झालेला स्पर्श आणि वेगवेगळ्या पक्ष्यांच्या होणाऱ्या दर्शनामुळे कोकरे आयलॅन्डची सफर अविस्मरणीय होऊन जाते.

Kokare Island Kugaon

उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातल्या भीमानगर (ता.माढा) या गावाजवळ आहे. या धरणाचे पाणी पुढे कर्नाटक राज्यामध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते. उजनी हे महाराष्ट्रातील जायकवाडी धरणानंतर सर्वात मोठे धरण आहे. सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील अर्थकारण व राजकारण यावर अवलंबून आहे. उजनी धरणाच्या माध्यमातून सुमारे २५००० कोटी रूपयाची उलाढाल होते. पर्यटनाच्या बाबतीत महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे दरवर्षी आवर्जून येणारे देश-विदेशी हजारो पक्षी. यामुळे उजनी बॅकवॉटर जलाशय हा पाणपक्ष्यांसाठी देशात प्रसिद्ध पावत आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून या बॅक वॉटरच्या क्षेत्रात काही पर्यटन केंद्र विकसीत होत आहेत ज्यांच्याविषयी अनेकांना माहिती नाही. अशाच एका बेटाबद्दल आणि आयलॅन्डबद्दल (कृषि पर्यटन केंद्र) आज तुम्हाला माहिती सांगणार आहे.

कुगाव kugav एक निसर्गरम्य बेट

उजनी पाणलोट क्षेत्रात सोलापूर जिल्ह्यातील ज्या गावांना विस्थापित व्हावे लागले. त्यापैकीच एक गाव म्हणजे करमाळा तालुक्यातील कुगाव. दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला मोठा इतिहास आहे. हनुमानाची जन्मभूमी म्हणून गावाची ओळख आहे. याबाबतचा ‘भीममहात्म्य’ या पौराणिक ग्रंथातील ३३ व्या अध्यायात उल्लेख आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांनी कुगाव येथे भूईकोट किल्ला बांधला आहे. सध्या या ठिकाणीला उजनी धरणाच्या निर्मितीनंतर जलसमाधी लाभली आहे. धरणातील पाणी उथळ असताना हा किल्ला उघडा पाडतो. भारतातीतील हनुमान भक्त, शिवप्रेमी व पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. नागराज मुंजळे यांच्या सैराट चित्रपटातील काही प्रसंगाचे  चित्रिकरण या ठिकाणी करण्यात आले आहे.

 

संपूर्ण गावाला भीमा नदीच्या पात्राने तिन्ही बाजूने वेढा घातला आहे. त्यामुळे हा परिसर बेटासारखा भासतो. या ठिकाणी जमीन मार्गाने येण्यासाठी एकच मार्ग (प्रजिमा ११) आहे; हा मार्ग ही तितकासा सोपा नाही. त्यासाठी स्थानिक गावकरी, हनुमान भक्तांना व प्रवाशांना सुमारे १२० किलोमीटरचा वळसा घालून यावे लागते. तर उर्वरित चार मार्ग पुणे जिल्ह्यातील कळाशी, गंगावळण, कालठण व शिरसोडी गावातून पाण्यामार्गे येणारे आहेत. हा मार्ग सोपा होण्यासाठी कळाशी (ता.इंदापूर)ते कुगावपर्यंत पुल तयार झाला तर मराठवाड्याला जोडणारा हा जवळचा मार्ग होणार आहे. उजनी बॅकवॉटर परिसरातील पर्यटन विकासाला मोठी चालना मिळू शकते.

 कुगावचा कोकरे आयलॅड – Kokare Island Kugaon

 

उजनी लाभ क्षेत्रातील वैभव  लक्षात घेऊन कुगाव येथील प्रगतशील शेतकरी धुळाभाऊ कोकरे हे फेब्रुवारी २०१९ पासून पाच एकरांवर कोकरे आयलॅन्ड नावाने कृषि पर्यटन केंद्र विकसित करत आहे.

कोकरे आयलॅन्ड उभारणीबाबत धुळाभाऊ कोकरे म्हणाले, “आमच्या कोकरे परिवाराची उजनी बॅकवॉटर परिसरात जमीन आहे. त्यामध्ये ऊस आणि केळी ही मुख्य बागायती पिके आहेत. आमच्या कुगावला मोठा पौराणिक इतिहास तर आहेच; शिवाय इथला निसर्ग जगाच्या नकाशावर यावा, स्थानिक पदार्थांना वाव मिळावा आणि शेतीला जोडधंदा मिळावा म्हणून कोकरे आयलॅन्डची उभारणी केली आहे. या पर्यटन केंद्रातून केवळ आमचा विकास होणार नाही तर यातून स्थानिक लोकांनाही रोजगार मिळणार आहे. या आयलॅन्डचा आकार एखाद्या द्विपसमूहासारखा आहे. या तिनही बाजूंनी विस्तीर्ण जलाशय, देशी विदेशी पक्ष्यांचा संचार, नीरव शांतता ही या पर्यटन स्थळाची जमेची बाजू आहे. त्यामुळेच निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटक याठिकाणी येत असतात. सध्या हे केंद्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे.”

हिवाळ्याची चाहूल लागताच उजनी जलाशयावर हजारो किलोमीटरचा प्रवास करून फ्लेमिंगोसह विविध प्रजातींच्या पक्ष्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात होते. कुंभारगाव, डिकसळ,भादलवाडी, डाळज, पळसदेव, गंगावळण, आगोती, कुगाव, भिगवण या उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसू लागतात. त्यानंतर पर्यटकांची पावले उजनी पाणलोट क्षेत्राकडे वळू लागतात.   पक्ष्यांचे आगमन हे पर्यटक,पक्षी अभ्यासक आणि पक्षीप्रेमीसाठी पर्वणीच ठरते.

कोकरे आयलॅन्डच्या Kokare Island Kugaon संचालिका व माजी सरपंच तेजस्विनी कोकरे सांगतात, ” पर्यटकांना जलविहार करता यावे, यासाठी नौका विहारची सोय करण्यात आली आहे. जलाशयावर विहार करणारे फ्लेमिंगो (रोहित-अग्निपंख), पेंटेड स्टॉर्क (चित्रबलाक-रंगीत करकोचा), ग्रे हेरॉन (राखी बगळा), ग्रेट इग्रेट (मोर बगळा), कॉमन कूट (चांदवा), ब्लॅक हेडेड आयबिस (काळ्या डोक्‍याचा शराटी), ब्राऊन हेडेड गल (तपकिरी डोक्‍याचा कुरव), ब्लॅक हेडेड गल (काळ्या डोक्‍याचा कुरव), एशियन ओपनबिल (मुग्धबलाक), पर्पल स्वॅम्पहेन (जांभळी पाणकोंबडी) पर्पल हेरॉन (जांभळा करकोचा), लिटल कॉर्मोरंट (छोटा पाणकावळा), ग्रेट कॉर्मोरंट (मोठा पाणकावळा), रुडी शेल्डक (चक्रवाक), नॉर्दर्न शॉवेलर थापट्या), युरोपिअन स्पूनबिल (चमचा) यांसारखे अनेक प्रकारचे पक्षी आणि पक्ष्यांचे दर्शन होते. त्यासोबतच

मच्छिमारांच्या होड्या, मासळीचे खमंग जेवण आणि सुर्योदय आणि सुर्यास्ताचे मनमोहक दृश्यही या ठिकाणावरून बघता येते. जलाशयात भरपूर खाद्य उपलब्ध असल्यानं पक्ष्यांसाठी ही पर्वणीच असते. तिन्ही ऋतूमध्ये नितांत सुंदर अनुभव येतोच; पण येथे दडलेल्या जैवविविधता व निसर्ग नवलांमुळे पर्यटकांची मजा द्विगुणित होते.”

देशी झाडे व वनस्पतींचे संवर्धन

या पर्यटन केंद्रात निसर्गाचा अधिवास जपणे,जैवविविधतेचे रक्षण करण्याबरोबरच विविध दुर्मिळ वृक्ष,देशी झाडांची रोपांची लागवड करण्यात आली आहे.आंबा, चिंच, नारळ, सुपारी, चिक्कू, कडुलिंब, बाभूळ, सिताफळ, वड, पिंपर,जांभूळ, पेरू, उंबर त्याचबरोबर पाणफुटी, तुळस, गुळवेल, अश्वगंधा, कोरफडीसारख्या वनौषधी पहायला मिळतात. या केंद्रात ऊस, केळी, मका, गहू, वांगे, टोमॅटो, अशी नानाविध पिकांचेही दर्शन होते.

 शिवारफेरीतून कृषि दर्शन – Kokare Island Kugaon

या आयलॅन्डच्या ठिकाणावरून उजनीकाठाचे सौंदर्याबरोबर ग्रामीण- कृषि जीवन संस्कृतीचे दर्शन ही पर्यटकांना होते. ग्रामीण भागातील लोक शहरात राहिल्यांने बऱ्याचवेळा आपली ग्रामीण जीवनाशी असलेली नाळ तुटते ती भरून काढण्याचा प्रयत्न कोकरे आयलॅन्ड करत आहे.

धुळाभाऊ कोकरे म्हणाले, ” आम्ही आमचे लक्ष शालेय विद्यार्थ्यांवर केंद्रित केले आहे. मुलांना भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती व्हावी यासाठी परिसर अभ्यास नावाचा भाग असतो. इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात ‘जलदिंडी’ नावाचा धडा आहे. जलदिंडीचा प्रवास आळंदी ते पंढरपूर असा पाण्यामार्गे असतो. आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून या जलदिंडीचा कोकरे आयलॅड येथे विसावा असताना मुलांना याची प्रत्यक्षात पाहणी करत अनुभव घेता  येतो. मुलांना निसर्गाचे दर्शन व्हावे आणि ग्रामीण जीवन कळावे म्हणून आम्ही विशेष व्यवस्था करतो. हंगामानुसारचे पीके, ऊस व केळीची डेमो प्लाँट, फळझाडे, वनस्पतीची शिवार फेरीच्या माध्यमातून माहिती देत असतो. विशेष म्हणजे मुलांना त्यांच्या शिक्षकांबरोबर बैलगाडी, ट्रॅक्टर व बोटींगच्या माध्यमातून फेरी मारण्यात येते. मैदानात पारंपरिक पद्धतीचे विटी दांडू, खो खो, कबड्डी असे देशी खेळ शिकवले जातात.”

 कोकरे आयलॅन्डची वैशिष्ट्ये Kokare Island Kugaon Feature

१ ) हनुमान जन्मभूमी

२) तिन्ही बाजूंनी उजनी बॅकवॉटर

३) बोटिंगची सुविधा, पक्षी पाहण्याची संधी

४) शालेय सहलीची शासकीय परवानगी

५) शिवार फेरी,प्रत्यक्ष शेतीची प्रात्यक्षिके.

६) राहण्याची सोय, स्थानिक भोजनाची सोय

पारंपरिक शेतीला थोडे व्यवसायिक रूप दिले तर जास्तीचे उत्पन्न मिळू शकते हे कोकरे कुटुंबियांनी दाखवून दिले आहे.या व्यवसायासाठी शहरात वा अन्य ठिकाणी जाऊन स्थलांतर करण्याची गरज नाही हे विशेष म्हणजे आपल्या गावात, शेतात राहून कृषिसेवा करता येते.

“कोरोनाचा कृषि पर्यटनाला फटका”-

“गेल्या एक वर्षांपासून कोरोनाच्या चाललेल्या खेळाचा मोठा फटका ग्रामीण अर्थकारणाशी निगडित असलेल्या कृषि पर्यटन केंद्रांना बसला आहे. चालू वर्षात कृषि पर्यटनाला बसलेला फटका भरून निघेल अशी आशा होती. हल्लीचा कोरोना काळ संपवावा आणि तीन चार दिवस बाहेर कुठे तरी जाऊन यावे असे प्रत्येक पर्यटकांना वाटत आहे; पण याही वर्षी टाळेबंदीमुळे पर्यटक घराबाहेर पडू शकत नाहीत. कोरोनाच्या तडाख्यातून हळूहळू का होईना; पण जगाची सुटका होणे आवश्यक आहे. तरच पर्यटन केंद्रांना पुन्हा एकदा झळाळी मिळेल.”

संपर्क
कोकरे आयलॅन्ड, कुगाव
मो नं:-७७४४००००८४
Dayanand D Kokare
कोकरे आयलॅन्ड कुगाव / Kokare Island Kugaon
महेश धुळाभाऊ कोकरे
धुळाभाऊ कोकरे
तेजस्विनी दयानंद कोकरे

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय