इंदापूर प्रतिनिधी – गोविंद पाडूळे :- इंदापूर तालुक्यातील कालठण नं.1येथे सायंकाळी पाच वाजता श्रीकांत पवार या शेतमजूर शेतकऱ्याच्या शेळ्यांवर पंधरा ते वीस भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून दोन शेळ्या व दोन बोकड मारून खाल्ले. तसेच पाच ते सहा शेळ्यांना या कुत्र्यांनी जखमी केले. याआधी देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले केलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या त्यात मारले गेले आहेत व जखमी झालेले आहेत. पाळीव जनावरांना भटके कुत्रे हल्ला करून जखमी करत आहेत.
कालठण नं.1 येथे शासनाची बंदी असलेल्या बेकायदेशीर मांगुर माशाचे अनेक तळी आहेत. या तळ्यावर चिकनचे व मेलेल्या जनावरांचे वेस्टेज खाद्य म्हणून वापरले जात आहे,ते इतरत्र ठिकाणी अस्ताव्यस्त फेकले जाते. ते वेस्टेज खाऊन भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे व ते माजलेले आहेत.पाळीव जनावरांवर हल्ले करत आहेत. रात्रीच्या वेळी शेतकरी मोटर चालू करण्यासाठी शेताकडे जात असतात. त्यावेळी भटके कुत्रे नागरिकांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत ग्रामपंचायकडे गावातील नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे. गावातील एखाद्या मनुष्याचे जीवित हानी होण्याची शक्यता आहे.
इंदापूर मध्ये प्रशासनाकडे जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नुकताच एका शाळकरी मुलीचा अपघातामध्ये मृत्यू झालेला होता. कालठणमध्ये देखील एखादी जीवित हानी होण्याची प्रशासन वाट पाहत आहेत का असा नागरिक सवाल करत आहेत.
बेकायदेशीर मांगुर उत्पादन करणाऱ्या नागरिकांकडून निष्काळजीपणे चिकन व मेलेल्या जनावरांच्या वेस्टेजची गावामधून वाहतूक केली जाते. याआधी काही दिवसांपूर्वी वाहतूक करताना संपूर्ण गावांमध्ये हे वेस्टेज सांडलेले होते. मांगुर उत्पादकांनी पोलिसांना कळवणाऱ्या नागरिकांवर शिवीगाळ करून हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु पोलिसांनी याकडे काना डोळा केला. त्यामुळे मांगुर उत्पादकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. इंदापूर पोलीस मांगुर उत्पादकांशी आर्थिक हितसंबंध जोपासून हात ओले करत आहेत का?