इंदापूर प्रतिनिधी: गोविंद पाडूळे- पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे हरीतलवादाची बंदी असलेल्या मांगुर माशांचे तस्करी करणाऱ्या टेम्पोवर (गाडी नं. MH 42 BF 5995)पोलिसांनी कारवाई केली.
शासनाची बंदी असलेल्या मांगुर माशांची चोरटी वाहतूक होत असलेल्या टेम्पोची माहिती मिळाल्यानंतर इंदापूर पोलिसांनी राजवडी येथील पुलाजवळ टेम्पो ताब्यात घेऊन मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे तीन टन मांगुर साठा नष्ट करण्यात आला. टेम्पो चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
इंदापूर पोलिसांनी पहिल्यांदाच मांगुर वाहतूक करणाऱ्या गाडीवर कारवाई केलेली आहे.
मत्स्य विभाग व पोलीस खाते सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्यामुळे मांगुर उत्पादकांचे धाडस वाढले आहे. मत्स्य विभागाकडून शासकीय परवानगीने मासे पाळण्याचा परवाना घेतला जातो आणि प्रत्यक्षात मात्र मांगुर सारखा बंदी असलेला मासा पाळला जातो. तसेच काही मांगुर तस्करांकडून परप्रांतीय लोकांमार्फत मांगुरचे उत्पादन केले जात आहे. मत्स्य विभागाने कारवाई करू नये म्हणून एकाच तळ्यामध्ये शासनाची परवानगी असलेला मासा व बंदी असलेला मांगूर मासा याचे एकत्रित पालन करण्याची शक्कल देखील लढवली जात आहे.
इंदापूर येथील तालुका पातळीवरील राजकीय नेतृत्वामुळे मांगुर मासा पालन करणाऱ्या मोठ्या माशावर कारवाई करण्यासाठी प्रशासन धजावत नाही. मांगुर उत्पादन व विक्री या व्यवसायामधून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्यामुळे मांगुर तस्करांना पाठीशी घातले जात आहे.
आरोग्यासाठी हानिकारक मांगुर मासामुळे कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो तसेच पर्यावरणाची हानी होत आहे. प्रशासन याला वेळीच आवर घालणार आहे का? अशी चर्चा इंदापूर मध्ये रंगत आहे. कारण यागोदर पण अशी कार्यवाही झाली होती तरी देखील सरास मांगुर उत्पादन चालू होते. अशा कितीही कारवाई झाली तरी मांगुरचे उत्पादन अद्याप थांबले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात प्रशासन यावर काय प्रतिबंध करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इंदापूर तालुक्यामधून मत्स्य विभागाकडे या अगोदर बरेचसे तक्रारी अर्ज दिलेले गेले आहेत. तसेच काही जणांनी उपोषणे धरणे आंदोलने केले आहेत. त्यामुळेच ही कारवाई झाली असावी असे चर्चा ला उधाण आला आहे. परंतु अद्याप देखील मांगुर उत्पादन हे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येत आहे. असे इंदापूर मधील लोकांमध्ये चर्चेच्या माध्यमातून समजत आहे.