मेलबर्न, 23 ऑक्टोबर: विराट कोहलीची ‘विराट’ इनिंग आणि त्यानं हार्दिक पंड्यासोबत केलेली शतकी भागीदारी याच्या जोरावर भारती संघानं पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात 4 विकेट्सनी सनसनाटी विजय मिळवला. अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर टीम इंडियाची सरशी झाली. नाबाद 82 धावा करणारा विराट कोहली भारताच्या या विजयाचा खऱ्या अर्थानं नायक ठरला. पाकिस्ताननं या सामन्यात भारतासमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतानं अखेरच्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर विजयी लक्ष्य गाठलं आणि खऱ्या अर्थानं मेलबर्नमध्ये दिवाळी साजरी केली.
त्याआधी भारतीय गोलंदाजांनी वर्ल्ड कप मोहिमेतल्या या सलामीच्या सामन्यात दमदार सुरुवात केली. टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगनं आपला पहिलाच वर्ल्ड कप खेळताना कमाल केली. त्यानं आपल्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला शून्यावरच माघारी धाडलं आणि भारताच्या वाटेतला मोठा अडसर दूर केला. त्यानंतर त्यानं भारताला आणखी एक यश मिळवून देताना रिझवानलाही 4 धावांवर बाद केलं. अर्शदीपनं आपल्या 4 ओव्हर्समध्ये 32 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय हार्दिक पंड्यानं 3 तर शमी आणि भुवनेश्वरनं प्रत्येकी एक विकेट घेतली. पाकिस्तानकडून शान मसूद (ना. 52 ) तर इफ्तिकार अहमदनं (51) धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानला 8 बाद 159 धावांची मजल मारता आली.