भंडारा प्रतिनिधि – क्रिष्णा बावनकुळे
राज्यात सर्वाधिक धान उत्पादन होणाऱ्या पूर्व विदर्भात मागील दीड दशकात खरेदी-विक्रीत कोट्यवधी रुपयांचा अपहार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शासकीय आधारभूत केंद्रांवर धानाची खरेदी केल्यापासून तर मिलिंगपर्यंत हा घोटाळा होतो. राज्य सरकारने नि:ष्पक्ष चौकशी केल्यास अनेक बडे व्यावसायिक गजाआड जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
Bhandara today news भंडारा जिल्ह्यात २०१२-१३मध्ये सर्वांत मोठा धान घोटाळा समोर आला. राज्य सरकारने याचा तपास थेट सीआयडीकडे दिला होता. दोन दिवसांपूर्वी तुमसर तालुक्यातील येरलीच्या केंद्रावर आठ कोटींचा धान घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. या केंद्रावर चक्क खरेदी न करताच धानाचा व्यवहार दाखविण्यात आला होता. हेच धान पुढे कागदोपत्रीच वाहतूक करून मिलिंगही केले जाते. यापूर्वी हजारो पोती धान पुरात वाहून गेल्याचे प्रकरणही समोर आले होते. हा घोटाळा दडपण्यासाठी केंद्रचालकांकडून दबाव वाढविला जात आहे. गोदाम, काटा, बारदाना, ग्रेडर नसतानाही मंजुरी दिली जात असल्याचाही आरोप होत आहे.
असा होतो व्यवहार
– परप्रांतातील धान आणून विकणे
– बोगस खरेदी दाखविणे
– वाहतूक खर्चाचे बोगस बिल जोडणे
– एकाच दिवशी अनपेक्षित ऑनलाईन खरेदी दाखविणे
– शेतकऱ्यांच्या सात-बाराचा गैरवापर करणे
– राजकीय दबावातून कारवाई न होणे