शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह हातातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे गट एकाकी पडला आहे. सर्वोच्च न्यायालयातून आशा आता धुसर झाली आहे. त्यातच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाच्या इतर आमदारांना आजपासून अधिवेशनात अग्निपरिक्षेला सामोरं जावं लागणार आहे.
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतंय. नेहमीप्रमाणे हे अधिवेशनही वादळी ठरणार आहे. शिवसेना पक्ष नाव आणि निवडणुक चिन्हं धनुष्यबाण हे केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यामुळे, आता विधिमंडळात ठाकरे गटाचे आमदारांची काय रणनिती असणार? याकडे सर्वाचं लक्ष असणार आहे. रविवारीच शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी सर्व ५६ आमदारांना व्हिप बजावल्यामुळे ठाकरे गटाचे आमदार हा व्हिप माणणार का? कायदेशीर निर्माण होणाऱ्या या पेच प्रसंगावर ठाकरे गटाचे आमदार कशी मात करणार? याकडेही सर्वाचे लक्ष लागलं आहे.
विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या पक्षचिन्हावरील सुनावणी दरम्यान 2 आठवडे ठाकरे गटाला व्हीप लागू होणार नाही, असा दिलासा आहे. पण, अधिवेशनामध्ये कोण कुणाच्या बाजूने मतदान करणार हा तिढा मात्र कायम आहे.
तसंच राज्यातील विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष पहिल्या दिल्लीपासूनच आक्रमक होणार असल्याची चूणुक त्यांनी रविवारच्या पत्रकार परिषदेत दाखवून दिली आहे. विरोधकांच्या या आक्रमक रणनितीला सत्ताधारी शिवसेना आणि भाजप युती कसे सामोरे जाणार हे पहिल्याच दिवशी स्पष्ट होईल. राज्याच्या अर्थ संकल्प अधिवेशनात 8 मार्चला राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल विधिमंडळात मांडणार आहे. तर 9 मार्च ला राज्याचा अर्थ संकल्प विधिमंडळात मांडणार आहे.