जि. लातूर प्रतिंनिधी व उध्दव फड – उद्धव फड 

आपल्या अवतीभोवतीचे वातावरण म्हणजे पर्यावरण ! पर्यावरणाचा समतोल निसर्ग टिकवत असतो. माणसाचा पर्यावरणातील हस्तक्षेप आणि ढवळाढवळ वाढल्याने, तसेच त्याच्या स्वार्थी आणि नियोजनशून्य वृत्तीमुळे पर्यावरणातील समतोल आज पुर्णपणे ढासाळतोय.निसर्गाच्या आले जर मना होत्याचे नव्हते करुन सोडायला एक क्षण पण लागणार नाही.म्हणुन माणसा आता तरी हो जागा … वृक्षलागवडीचा धागा… मानवाचे स्वास्थ्य पर्यावरणावर अवलंबून आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे !
आज जगासमोर सगळ्यात मोठं संकट कोणतं असेल, तर ते आहे पर्यावरण प्रदुषण. सरत जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक पर्यावरण प्रदुषणामुळे पृथ्वीचे कधी न भरून येणारे नुकसान होत आहे. निसर्ग व त्याचा समतोल राखणारे वृक्ष हे कायम आपल्या साठी उदारमती राहीले आहेत.

छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे, फलान्यपि परार्थाय वृक्षा सत्पुरुषां इव,|
जे त्यागाच्या भावनेने स्वतः उन्हात उभे राहतात, इतरांना सावली देतात. ज्यांची फळे -फुले ही दुसऱ्यासाठीच असतात. असे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्या सत्पुरुषाप्रमाणे अटळ असतात.
या वृक्षरूपी सत्पुरुषांचे सानिध्य अबालवृद्धांना, सामान्य जणांना व त्याच बरोबर अलौकिक विभूतींनाही लाभावे असे वाटते. म्हणूनच ऋषीमुनी रानावनात वस्ती करून निसर्गाच्या सानिध्यात अध्ययन, अध्यापन आणि तपश्चर्या करून निसर्गातील गूढ उकलण्याचा कायम प्रयत्न करीत असतात.
साहित्यिकांच्या जीवनात आणि साहित्यात निसर्ग एक अविभाज्य भाग आहे. तो सावली सारखा त्यांच्या सोबत वावरत असतो. संत काव्यात पानापानांवर वृक्षवेलींच्या उपमा,संज्ञा व दृष्टांत दिसतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात -‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरी ”
इंदिरा संत म्हणतात – ” जरी वेढिलें चार भिंतींनी,या वृक्षांची मजला संगत ” सामान्य मनुष्य नेहमीच्या संसारिक त्रासापासून, विचारांपासून दूर हवापालट म्हणून थंड हवेच्या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यातच जातो.
अश्या उपकारकर्त्या वृक्षांचा आज ऱ्हास होत चालला आहे. भूभागापैकी एकूण एक तृतीयांश जमीन वृक्षराजींनी व्यापलेली असलीच पाहिजे, तरच निसर्गाचा समतोल राखला जातो. आपल्या भारतात हे अत्यंत कमी म्हणजे एक पंचमांश पेक्षाही कमी आहे. पूर्वी हिमालयातील उत्तराखंड मध्य प्रदेश, आसाम, ओडिसा आणि बंगालच्या गंगेंच्या मुखाजवळील येथेच घनदाट असे जंगल होते.
परंतु आता तेथेही मानवाने कमी अधिक जंगलतोड करून वस्त्या तयार केलेल्या आहेत. तसेच जिकडे तिकडे बेसुमार जंगल तोड होत आहे. मानवाने वैराण असे वाळवंट तयार केलेली आहेत. म्हणतात कि ‘ मानवाचे पाऊल नि वाळवंटाची चाहूल ‘ अशी म्हणच आहे. आपल्यावर वृक्षाचे अनंत उपकार आहेत.
एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.
एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते.एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते…..

संवादतज्ञ – उध्दव फड

एका झाडापासून कुटूंबासाठी लाकडी सामान तयार होते.
एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.
एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.
एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.
एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.
एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते.
एक झाड 50 वर्षांत काय करतं आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा मी मुद्दामच मांडला आहे जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.
आता नाही तर कधीच नाही.
तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण 6 महिने
पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.
मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्या कडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.
तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.
म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगुन गेली.

।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे।।
मित्रांनो आज पासुन आपण शपथ घेऊया की प्रत्येकाने 1 किंवा 2 झाड लावायलाच पाहीजेत.
एक किंवा दोन झाडे लावा आणि ” निसर्ग मित्र व्हा ”
जनजागृती करा वृक्ष संवर्धनासाठी मदत होईल.
झाडाचे संवर्धन हे ३६५ दिवस करणे हे खरे पर्यावरण! खरे पर्यावरण म्हणजे शहरातून जंगलात जाणे नव्हे तर जंगलाला आपल्या शहरात आणणे हे महत्त्वाचे आहे. केवळ एक दिवस रोप लावणे म्हणजे पर्यावरण दिन संपत नाही. आपल्या घराच्या अंगणात किंवा परीसरात दरवर्षी एकतरी झाड लावणे आणि ते वाढविणे म्हणजे पर्यावरण आयुष्यात पाळणे, एक झाड तोडले तर दोन झाडे लावा हा नियम आपण पाळत नाही. लहानपणी आम्ही शाळेत १५ ऑगस्टला झाडे लावीत असू. ती चळवळ आता पर्यावरण दिनात पाळली जात आहे. आता शाळेत गेलो तर हे झाड आपण लावले हे अभिमानाने सांगू शकतो. नुसते झाड लावणे महत्त्वाचे नाही त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. म्हणून कविवर्य ग. दि. माडगुळकर म्हणतात,
हाती नाही बळ
दारी नाही आड
त्याने फुलझाड
लावू नये।।
पृथ्वीवर सर्वात बुद्धिवान जर कोणी असेल तर तो मानव. त्यामुळे त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेतला. मात्र परतफेड करण्याचे साफ विसरला. एखाद्या व्यक्तीकडून किंवा समाजाकडून जेव्हा आपण मदत घेतो तेव्हा त्याच्या प्रति नेहमी कृतज्ञ राहतो, कधीही कृतघ्न होत नाही. हा नियम पर्यावरणाशी मानवाने कधीच पाळला नाही. त्यामुळे आज ‘पर्यावरण वाचवा’ यासारखे वाक्ये कानी पडत आहेत.
सर्वप्रथम मी पर्यावरणाचा एक घटक आहे. याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. ज्याप्रकारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाचा एक घटक असल्याचे भान ठेवून वागतो त्यामुळेच त्या कुंटुंबात सुख, समृद्धी व स्थिरता दिसून येते. कुटुंबातील एक जरी व्यक्ती बेजबाबदारपणे वागला तर संपूर्ण कुटुंबाला त्याचे फळ भोगावे लागते. पर्यावरणाचे सुद्धा थोडेफार तसेच आहे. असे वाटत नाही काय? तसेच पर्यावरणाचे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे आणि ते कर्ज मला फेडायचे आहे हेही ध्यानात असू द्यावे. पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामागे वाढती लोकसंख्या हे एक प्रमुख कारण आहे.
आहे.वनखात्याला किंवा शासकीय यंत्रणेला नुसतीच नावं ठेवण्यापेक्षा लोकांनी काही मदत केली तर खूप जास्त सकारात्मक काहीतरी होऊ शकेल. मला प्रामुख्याने वाटतंय ज्या लोकांना थोडासा कळवळा आहे या सगळ्यांबद्दल, त्यांनी सरकारी लोक किंवा यासंदर्भात धोरणं आखणार्‍या लोकांबरोबर काम केलं तर बर्‍याच गोष्टी होऊ शकतील.
आज पृथ्वीवरील वातावरणातील बदलामुळे अनेक नैसर्गिक संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे याच मुख्य कारण आपण पर्यावरणाकडे केलेले दुर्लक्ष. शहरतील प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा अमर्याद उपसा, शहरातील वाहनांचे वाढते प्रमाण हे पर्यावरण शुद्ध राखण्यास घातक ठरत आहे. जल,वायु,ध्वनी यांचे प्रदुषण तर पर्यावरणाला मारकच आहे. म्हणून आता शहरीकरण करताना निसर्ग साखळी कोठे तुटली जात नाही ना याचा विचार होणे गरजेचे आहे.कारण कितीही सुधारणा झाल्या तरी पर्यावरणाचा समतोल टिकला नाही तर त्यांचा काहीच उपयोग होणार नाही.

संवादतज्ञ – उध्दव फड

निसर्ग आणि मानव यांचे सहजीवन अगदी प्राचीन काळापासून आहे. आपल्या ऋषीमुनिंनीते ओळखलं त्याचा
अभ्यास केला.आणि विविध मार्गानी टिकविण्याचा प्रयत्नही त्यांनी वर्षानुवर्षे केला.पण औद्योगिक क्रांतीनंतर मात्र माणूस निसर्गापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजू लागला. निसर्गापासून दूर जाऊन निसर्गावर मात करण्याचे अनेक क्षेत्रातील मानवाचे प्रयत्न मानवाला पर्यावरणापासून दूर नेत आहेत. आपण निसर्गापासून वेगळे आहोत; ही मानवाची भावनाच मुळी चुकीची आहे. माणसाने निसर्गावर हल्ले चढवले; तर निसर्ग कसा स्वस्थ बसेल ? भूकंप ,महापूर दुष्काळ ज्वालामुखी उद्रेक, त्सुनामी, अतिवृष्टी किंवा कमी वृष्टी अशा अनेक हत्यारांनी निसर्गही आपल्यावर हल्ले चढवतच आहे. ती नैसर्गिक आक्रमणे परतवून लावयची असतील तर निसर्गाशी हातमिळवणी करून त्याचा ढळलेला समतोल जैसेथे करण्यात मानवानेच पुढकार घेणे गरजेचे आहे.. पुढच्या पिढीसाठी तरी आपण पर्यावरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पृथ्वीवर केवळ मनुष्यच एकटा सजीव आहे आणि या पृथ्वीवरील सर्व उपभोग्य वस्तूंचा उपभोग घेण्याचा अधिकार केवळ मानवाचाच आहे; हा स्वार्थी विचार बाजुला ठेऊन वृक्ष, प्राणी, पक्षी यांचे नैसर्गिकपणे जगण्याचे हक्क आपण त्यांना परत दिले पाहिजेत. त्यांची वाढ होण्यास मदत केली पाहिजे. ‘जगा आणि जगू द्या’ हा मंत्र लक्षात घेऊन आपण आपली बदललेली जीवनपद्धती सुधारली पाहिजे .चला संकल्प करू या.. एक झाड जगण्यासाठी लावु या…..
🙏🏻🌱
संवादतज्ञ
उध्दव फड
९७६५५८८८००

परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

Reg.No.- UAM-MH-24-0006758

संपर्क7841913458

Email- abcmarathinews१@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमने चालू आहे इच्छुकांनी संपर्क करा

📲7841913458

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय