इंदापूर प्रतिनिधी – गोविंद पाडूळे
दि.२५/ इंदापूर तालुक्यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये आंध्र प्रदेश येथील परप्रांतीय मच्छीमार मोठ्या संख्येने आलेले असून बेकायदेशीरपणे विनापरवाना उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये मासेमारी करत आहेत. लाकडी पिंजऱ्यांच्या साह्याने ते मासेमारी करत असतात.नियमबाह्यपणे 200 ग्रॅम पेक्षाही कमी वजनाचे रहू, कटला यासारखे मासे परप्रांतीय मच्छिमार राजरोसपणे पकडत असतात.
धरणाच्या बॅक वाॅटरच्या परिसरामध्ये परप्रांतीय मच्छीमारांची संख्या खूप वाढलेली आहे. परप्रांतीय मच्छिमार स्थानिक भूमिपुत्र मच्छीमारांवर दादागिरी करत असतात. परप्रांतीय मच्छिमार उजनी संपादित क्षेत्रामध्ये बेकायदेशीरपणे झोपड्या बांधून राहत आहेत व दारू पिऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांवर देखील दादागिरी करत आहेत. परप्रांतीय मच्छीमारांमुळे स्थानिक मच्छीमारांच्या अधिकारावर गदा येऊन रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये उजनी धरण बॅकवॉटरला सर्व ठिकाणी व विशेषता कालठण नं 1 व कळाशी या गावांमध्ये स्थानिक पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्यामुळे परप्रांतीय मच्छीमार हे स्थानिक भूमिपुत्र मच्छिमारांना त्रास देत आहेत.
स्थानिक मच्छीमारांनी वार्ताहरांशी बोलताना परप्रांतीय मच्छीमारांवर कारवाई करण्यात यावी यासाठी वारंवार सांगून देखील प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. तसेच रंगा बाबू नामक व्यक्ती परप्रांतीय मच्छीमारांचा म्होरक्या असून स्थानिक पुढार्यांचा वरदहस्त असल्यामुळे भूमिपुत्र असणाऱ्या मच्छिमार व शेतकऱ्यांवर देखील दादागिरी करत असतो व त्याने आंध्र प्रदेशातील अनेक लोकांना येथे मच्छीमारी करण्यासाठी आणले आहे व उजनी धरण संपादित क्षेत्रात बेकायदेशीरपणे शासनाची बंदी असणाऱ्या मांगुरचे उत्पादन करत आहे असे कालठण येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
परप्रांतीय मच्छीमारांच्या या अतिक्रमण, घुसखोरी व दादागिरी संदर्भात पाटबंधारे विभाग, मत्स्य विभाग, पोलीस व तहसीलदार यांना निवेदन देणार असल्याचे कालठण येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले.
बेकायदेशीरपणे राहणाऱ्या व विनापरवाना उजनी धरण परिसरामध्ये मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय मच्छीमारांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा परप्रांतीय मच्छीमार हटाव भूमिपुत्र बचाव यासाठी लवकरच मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.