नवी दिल्ली : आज क्रिकेटप्रेमींचं लक्ष भारत -पाकिस्तानच्या (Ind vs Pak) सामन्याकडे लागलं आहे. कधी हा सामना सुरू होतो आणि मैदानातील फटकेबाजी कधी दिसून येते, असं क्रिकेटप्रेमींना झालं आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ आज आशिया चषकच्या (Ind Vs Pak Asia Cup 2022) त्यांच्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारताविरुद्ध (India) खेळणार आहे. जगाच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. संपूर्ण क्रिकेट विश्वात या सामन्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान संघानं हा निर्णय घेतला आहे. या सामन्यात पाकिस्तानचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरतील. खेळाडू अनेकदा काळ्या पट्टीनं खेळतात. यावेळीही तसेच आहे. आपल्या देशातील पुरामुळे बाधित झालेल्या लोकांशी एकता दाखवण्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंनी हा निर्णय घेतला आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने ट्विट करून याबाबत माहिती दिली.
पाकिस्तानमध्ये सध्या पुराचा कहर सुरूच आहे. या कहरात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांना घरे गमवावी लागली आहेत. पाकिस्तानमध्ये खैबर पख्तून, बलुचिस्तान, सिंध प्रांतात पुराने कहर केला आहे. या पुरामुळे बलुचिस्तानचा देशाच्या इतर भागांशी संपर्क तुटला आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत या पुरात 119 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी बलुचिस्तानमधील चार, गिलकिट बाल्टिस्तानमधील सहा, खैबर पख्तूनमधील 31 आणि सिंध प्रांतातील 76 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुरामुळे 110 जिल्हे प्रभावित झाले आहेत. 72 जिल्हे दुर्घटनाग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या पुरामुळे पाकिस्तानात 33 दशलक्ष लोक प्रभावित झाले आहेत. जिओ न्यूजनुसार, 950,000 घरे उद्ध्वस्त झाली आहेत, त्यापैकी 650,000 घरे अर्धी उद्ध्वस्त झाली आहेत.